राष्ट्रीय विजेत्यांनी राज्याला केले इन्स्पायर; संचालकांच्या ऑनलाईन उपस्थितीत साताऱ्यातून प्रेरणादायी कार्यक्रम
सातारा : महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे, राज्य विज्ञान शिक्षण संस्था नागपूर आणि सातारा जिल्हा परिषद, शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दिनांक ९ ऑक्टोंबर रोजी दुपारी ३ ते ५ या वेळेत फेसबुक लाईव्हव्दारे राज्यातील सर्व विद्यार्थी व शाळांना इन्स्पायर अवार्ड योजनेमधून राष्ट्रीय स्तरावर विजेते झालेल्या पाच विद्यार्थ्यांमार्फत मार्गदर्शन करण्यात आले. या पाच विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे गमक या कार्यक्रमातून विद्यार्थी, शिक्षक व पालक यांच्यासमोर व्यक्त केले. किशोरावस्थेतील मुले म्हणजे वय वर्षे १० ते १५ या वयोगटातील इयत्ता ६ वी ते १० वी च्या वर्गातील प्रतिभावंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन विज्ञानाकडे आकर्षित करणे, त्याचबरोबर शोध आणि विकास यांची सांगड घालून त्यांच्या कल्पना शक्तीला वाव देऊन समाजोपयोगी साधन निर्मिती करुन दैनंदिन जीवनातील समस्यांचे निराकरण करण्यास प्रेरणा देणे हा इन्स्पायर अवार्ड या योजनेचे मुख्य उद्दीष्ट आहे. सध्या इन्स्पायर अवार्ड योजनेतील वाढीव मुदतीत नोंदणी वाढविण्यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यातून प्रयत्न सुरु आहेत. नोंदणीची सद्यस्थिती- *देशात महाराष्ट्र १० व्या स्थानी असून पहिल्या ५ मध्ये आणण्यासाठी प्रयत्न सुरू . *राज्यात पुणे, नाशिक, सांगली, सातारा व भंडारा हे जिल्हे नोंदणीत आघाडीवर. *पालघर, ठाणे, मुंबई (उपनगर), हिंगोली, औरंगाबाद, मध्ये अत्यंत कमी नोंदणी . *सातारा जिल्ह्यातून आतापर्यंत १५०० विद्यार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी. * १५ ऑक्टोंबरपर्यंत वाढीव मुदत . यांनी दिली प्रेरणा- राष्ट्रीय स्तरावरील विजेते व मार्गदर्शक विदयार्थी- अनुज लोणकर (पुणे, महाराष्ट्र) सईदा उरुज (मंड्या, कर्नाटक) सिध्दार्थ कुशवाह (प्रयागराज, उत्तर प्रदेश) आर्यन माळी (सांगली, महाराष्ट्र) आशिष राऊत (अहमदनगर, महाराष्ट्र) कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत राजेश क्षीरसागर, शिक्षणाधिकारी (माध्य.)जि.प.सातारा यांनी केले. या कार्यक्रमाचा मुख्य हेतू विद्यार्थ्यांना शालेय स्तरापासूनच विज्ञान विषयाच्या अभ्यासाकडे आकर्षित करणे आणि विज्ञान व तंत्रज्ञान यामधील संशोधन व विकास यासाठी त्यांना चालना देणे असा आहे.इन्स्पायर या कार्यक्रमाचा इन्स्पायर अवार्ड हा एक घटक आहे असे स्पष्ट करत जास्तीत जास्त विदयार्थ्यांनी या प्रकल्पात सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले. 'समस्येसोबत जगणे न शिकता,समस्या निराकरण करण्यास विदयार्थ्यांनी शिकावे' यासाठी इन्स्पायर अवॉर्ड हा प्रकल्प सुरु करण्यात आला आहे ,असे गुजरातहून सहभागी झालेले राष्ट्रीय नवप्रवर्तन प्रतिष्ठानचे (एन आय एएफ तज्ज्ञ मार्गदर्शक राकेश माहेश्वरी यांनी स्पष्ट केले. तत्कालीन राष्ट्रपती व मिसाईल मॅन डॉ.अब्दुल कलाम यांच्या संकल्पनेतून साकार झालेला, भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभाग नवी दिल्ली मार्फत सन २००९-२०१० पासून विज्ञान शिक्षण संशोधनासंबंधी सुरु असलेला 'इन्स्पायर (Innovation in Scince Pursuit for Inspire Research)' हा शालेय विद्यार्थ्यांकरता ११ व्या पंच वार्षिक योजनेमध्ये सुरु केलेला महत्वाकांक्षी कार्यक्रम असल्याचे त्यांनी सांगितले. एन आय एफच्या डॉ.प्रियंका खोले यांनी विदयार्थी व शिक्षकांसाठी मार्गदर्शन सूचना सांगितल्या. ते उपकरण नावीन्यपूर्ण व समाजोपयोगी असावे. या सर्व निकषांचा विचार राष्ट्रीय स्तरावर सर्वोत्कृष्ट उपकरणाची निवड होते असे त्यांनीनमूद केले तसेच इन्स्पायर अवार्ड योजनेसंबंधी सविस्तर माहिती सांगितली. राष्ट्रबांधणीत महाराष्ट्राचे योगदान अनन्यसाधारण असे आहे. यांचे स्मरण करुन देत नागपूरहून सहभागी झालेल्या राज्य विज्ञान संस्थेचे संचालक रविंद्र रमतकर यांनी इन्स्पायर प्रकल्पातही महाराष्ट्रातील सर्व जिल्हयातील विदयार्थ्यांचा सहभाग वाढावा सर्व विदयार्थ्यांना तसेच शिक्षकांना योग्य मार्गदर्शन मिळावे, इन्स्पायर अवार्ड नामांकन २०२० साठी महाराष्ट्र राज्य देशामध्ये अग्रेसर असावे या हेतूने या कार्यक्रमाचे नियोजन NIF व DST यांच्यामार्फत केले गेले असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असलेल्या राष्ट्रीय अवार्ड विजेत्या बालवैज्ञानिक विदयार्थ्यांनी स्वानुभवातून केलेले मार्गदर्शन प्रेरणादायी ठरेल असे होते. भावी विजेते होण्याची स्वप्न पाहणा-या विदयार्थ्यांना मार्गदर्शन केले. सर्वप्रथम अनुज लोणकर याने 'मिनिपोर्टेबल फ्रीज' या आपल्या उपकरणाचा प्रवास राष्ट्रीय पातळीपर्यंत कसा झाला व इन्स्पायर अवार्ड या उपक्रमामुळे त्याच्यातील वैज्ञानिक कसा घडत गेला हा अनुभव सर्वांना सांगितला. मंडया कर्नाटकमधील बालवैज्ञानिक सईदा उरुज हीने फिरते फळविक्रेते, भाजीपाला विक्रेते यांना येणा-या समस्यांचा मानवतेच्या भावनेतून विचार करुन त्यांच्यासाठी ' मिरॅकल अम्ब्रेला' हे उपकरण तयार केले. त्यावेळी आलेल्या अनुभवांचे कथन सईदाने याप्रसंगी केले. स्वतःवर विश्वास ठेवा, यश मिळेलच असा संदेशही तिने सर्वांना दिला. प्रयागराज, उत्तरप्रदेश येथील सिद्धार्थ कुशवाह या संवेदनशील बालवैज्ञानिकाने सांगितले की, जर आपण ठरवले तर उच्च दर्जाच्या विचारातून एखादे उपकरण निर्माण होऊ शकते हे सिद्ध केले. आपल्या 'फायटींग रोबोट' या बहुउद्देशीय उपकरण निर्मितीचा प्रवास सिद्धार्थने सर्वांना सांगितला. या रोबोटचा गुन्हेगारी कमी करण्यासाठी निश्चितच उपयोग होईल असे सांगताना त्याने विदयार्थांना सभोवतालचे निरीक्षण, समस्या शोध, समस्या निराकरणासाठी उपलब्ध पर्याय आणि या पर्यायांपेक्षा वेगळा विचार या टप्प्यांना अनुसरुन प्रकल्प निर्मिती करावी असा सल्ला सिध्दार्थने दिला. सध्या सगळीकडेच प्लास्टिक बॉटल्सचा कचरा वाढताना दिसतो आहे. या टाकाऊ बॉटल्सचा वापर करुन नवीन वस्तूंची निर्मिती करता येईल व एक छोटासा उदयोगच उभा राहू शकेल हे सांगली महाराष्ट्राच्या आर्यन माळी या बालवैज्ञानिकाने आपल्या 'वेस्ट प्लास्टीक बॉटल्स अॅज अ स्मॉल इंडस्ट्री ' या उपकरणाद्वारे दाखवून दिले .या प्रकल्पामुळे मिळालेल्या विविध संधीची माहिती आर्यनने दिली. प्रत्येक नागरिक हा देशाचे काहीतरी देणे लागतो या जाणिवेतून अहमदनगर, महाराष्ट्रातील बालवैज्ञानिक आशिष राऊत याने भारतासारख्या प्रचंड लोकसंख्या असलेल्या देशात शौचालयांची जी समस्या आहे. ती सोडवण्यासाठी आपल्या 'फोल्डींग टॉयलेट' या उपकरणाची कल्पना सत्यात कशी उतरवली हे अतिशय प्रेरक शब्दात सर्वांना सांगितले. राष्ट्रीय इन्स्पायर अवार्ड ही गोष्ट आपले जीवनच बदलवून टाकते. इथेच हा प्रवास थांबत नाही, तर इथून आयुष्याची खरी सुरुवात होते, असे प्रेरणादायी विचार आशिषने यावेळी मांडले. राष्ट्रीय इन्स्पायर अवार्ड विजेत्या विदयार्थ्यांसोबत फेसबुक लाईव्हव्दारे महाराष्ट्रातील अनेक विदयार्थ्यांनी प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून संवाद साधला. यातून विदयार्थ्यांना नवनवीन संकल्पनांविषयी माहिती मिळाली. या कार्यक्रमाचे आभार मंगल मोरे, उपशिक्षणाधिकारी (माध्य.) जि.प. सातारा यांनी आभार व्यक्त केले.सूत्रसंचालन गज्जम श्रीनिवास श्रीहरी यांनी केले. व विदयार्थ्यांमधून आलेले प्रश्न विजेत्यांना भाग्यश्री फडतरे व झुल्फिकार मुल्ला यांनी विचारले. या कार्यक्रमाचे रेकॉर्डिंग फेसबुक व युट्युबवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.