शेतकऱ्यांची मालकी अबाधित राखणार : मदन भोसले; खंडाळा कारखान्याचे बॉयलर प्रदीपन
खंडाळा : खंडाळा तालुक्यात अनेक कंपन्या उभ्या राहिल्या आहेत. मात्र, या कंपन्यांच्या गर्दीत केवळ किसनवीर खंडाळा साखर कारखाना शेतकऱ्यांच्या मालकीचा आहे. हा कारखाना उभा करताना काही गमवाव लागल असेल तर याची खंत न बाळगता शेतकऱ्यांच्या मालकीचा उदयोग उभा केला, याचा आनंद असून शेतकऱ्यांची मालकी अबाधित राहिल, असा विश्वास किसन वीर कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले यांनी व्यक्त केला.
म्हावशी, ता. खंडाळा येथील किसनवीर खंडाळा साखर कारखान्याचे निवृत्त तहसिलदार दिनकर राऊत व सौ. लता राऊत यांच्या हस्ते बॉयलर अग्निप्रदीपन झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी खंडाळा कारखान्याचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शंकरराव गाढवे, कारखान्याचे उपाध्यक्ष गजानन बाबर यांची प्रमुख उपस्थिती होती मदनदादा म्हणाले, प्रतापराव भोसले यांनी कारखान्यासाठी मिळवलेला परवाना जपण्याचे काम शंकरराव गाढवे यांनी केले. यासाठी अनेक अमिष दाखवण्यात आली मात्र खासगीकरणाची वाट न धरता हे सार उभ केल. शेतकरी हिताचा विचार करताना जरुर काही चढ उतार आले.पण आमच्या हेतूत कधीच खोट येणार नाही.
शंकरराव गाढवे म्हणाले, ही संस्था उभारताना मदन भोसले यांनी काय सोसलं हे मी पाहिलं आहे. आज एवढी मोठी संस्था एका दुष्काळी तालुक्यातील माळरानावर उभी राहिली? याचं काहींना समाधान राहूदया पण दु:ख असावं, यासारखं दुर्देव नाही. ही संस्था ना माझ्या मालकीची नाही आणि मदन भोसले यांच्या तर नाहीच नाही. या परिसरातील सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मालकीची ही संस्था आहे. जनतेच्या मालकीची संस्था कायम रहावी, यासाठी सहकार्य करण्याची भावना ठेवली पाहिजे.
यावेळी नगराध्यक्ष प्रल्हाद खंडागळे, अनिरुद्ध गाढवे, केतन भोसले, पै. मधुकर शिंदे, सचिन साळुंखे, प्रकाश पवार, विजय चव्हाण, राहुल घाडगे, अरविंद कोरडे, साहेबराव महांगरे यांच्यासह पदाधिकारी, संचालक व अधिकारी उपस्थित होते.